पुणे : शहर परिसरात दिवसा कार, टँकरवर चालक म्हणून काम करत रात्री वाहन, मोबाईल चोरी करणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लोणीकंद, हडपसर, चंदननगर, कोंढवा भागातून चोरलेल्या ९ दुचाकी आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले असून विविध पोलीस ठाण्यातील १२ गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने केली आहे.
सत्यम नामदेव काळे (२१, रा. मुंढवा, मूळ रा. जालना), स्वागत आप्पा मांढरे (१९, रा. मुंढवा, मूळ. रा. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही आरोपी एकमेकांच्या परिचयातील आहेत. काळे हा स्विफ्ट कारमधून प्रवासी वाहतूक करायचा. तर, मांढरे हा टँकरवर चालक म्हणून काम करत होता. दोघे पुण्यात कामानिमित्त वास्तव्यास आहेत. शहरात वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त घालत होते.
या दरम्यान पोलीस अंमलदार विक्रांत सासवडकर व राहुल इंगळे यांना मिळालेल्या माहितीनुसार दोघा संशयित वाहनचोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी हडपसर, चंदननगर, लोणीकंद भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली. अधिकच्या तपासात दोघांनी मिळून शहरातील मुंढवा, बंडगार्डनसह इतर काही भागातून वाहन, मोबाईल चोरी केल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून एकूण ९ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.
दोघेजण दिवसा कार, टँकरवर चालक म्हणून काम करतात. तर, रात्री वाहनचोरीचे गुन्हे करत असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक पाडवी, उपनिरीक्षक गुंगा जगताप, अंमलदार अशोक आटोळे, विनायक रामाणे, शिवाजी जाधव, संदीप येळे, दत्तात्रय खरपुडे, अमोल सरतापे यांच्यासह पथकाने केली आहे.