पुणे : पुणे पानशेत रस्त्यावरील सोनापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोथरूड येथील दोन महाविद्यालयीन तरुण बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.२०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
फरहान अलीम शेख (वय-१८) आणि साहिल विलास ठाकर (वय-१९, दोघेही रा. कोथरूड, पुणे) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील पाच तरुण हे सोनापूर गावाच्या हद्दीतील असलेले खडकवासला धरण पाहण्यासाठी आले होते. तेव्हा फरहान आणि साहिल असे दोघेजन पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहोता येत नसल्यामुळे काही क्षणातच हे दोन तरुण धरणात बुडाले.
दरम्यान, मित्र बुडत असल्याचे पाहून तरुणांनी आरडाओरडा केला. मात्र ते काही वेळानंतर पाण्यात बुडाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली.
अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शोधमोहीम राबवून मोठ्या शिराफिने पाण्यात बुडालेल्या या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.