युनूस तांबोळी
शिरूर : चांडोह ( ता. शिरूर ) येथील शेतकरी भानुदास गणपत गाडगे ( वय ५५ ) याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. याबाबत मुलगा संजय गाडगे यांनी फिर्याद दिली आहे.
गाडगे यांची चांडोह येथे तीन एकर शेती आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ते कांद्याला पाणी देण्यासाठी शेतीवरील विहिरीवर गेले होते. ते परत घरी न आल्याने त्यांचा मुलगा संजय भानुदास गाडगे हा त्यांना पहायला शेतावर गेला.
त्यावेळी त्याला शेतातील विहीरजवळ बॅटरीची लाईट एका जागेवर दिसत असल्याने तो विहिरीवर गेला. तेव्हा त्याला त्याचे वडील दिसले नाही. त्याने विहिरीमध्ये पाहिल्यावर त्याला वडीलांची चप्पल दिसली. त्याने आजूबाजूच्या लोकांना फोन करून बोलावून घेतले.
गावातील लोकांच्या मदतीने त्याने वडीलांचा विहीरीत शोध घेतला. त्यावेळी वडील पाण्यात मृतअवस्थेत सापडले. त्यांना पोहता येत नसल्याने पाय घसरून विहीरीत पडल्याने पाण्यात बूडून मृत्यू झाला. असा जबाब नोंदविण्यात आला आहे.