शिरुर :लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारचालकाने शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गोलेगाव (ता. शिरुर) येथे शुक्रवारी (ता. १७) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाच्या विरोधात विनयभंगासह बाललैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थिनी गोलेगावातून शिरुर शाळेत जाण्यासाठी गाडीची वाट पाहत शुक्रवारी (ता. १७) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास थांबली होती. तेव्हा शाळेत जाण्यासाठी उशीर होत असल्याने विद्यार्थिनीने एका कार चालकाला लिफ्ट मागितली. तेव्हा कारचालकाने गाडी थांबविली. त्या कारमध्ये एक २० ते २५ वर्ष वयाचा एक मुलगा ड्रायव्हर सीटवर बसलेला होता. व त्याच वयाची एक मुलगी मागच्या सीटवर बसलेली होती.
विद्यार्थिनीने त्यांना विचारले मला शिरुरला सोडता का? तेव्हा त्यांनी होकार दिला. विद्यार्थिनी मागच्या सीटवर बसु लागली असता पाठीमागे बसलेली मुलगी तीला म्हणाली की ‘पुढच्या सीटवर बस’ त्यामुळे सदरची मुलगी पुढच्या सीटवर बसली.
कारमध्ये बसून थोडे अंतर पुढे गेल्यानंतर कारचालक विद्यार्थिनीशी अश्लीश चाळे करू लागला. व ‘तु आमच्या सोबत चल आम्ही तुला पैसे देवु असे असे म्हणु लागला. तेव्हा विद्यार्थिनीने त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले असता ते कार थांबवित नव्हते. त्यानंतर विद्यार्थिनी आरडाओरड करु लागली. त्यामुळे त्यांनी शिरुर येथील गोलेगाव पुलाजवळ कार थांबविली. आणि विद्यार्थिनी कारमधून खाली उतरली.
दरम्यान, विद्यार्थिनीने कारमधून खाली उतरल्यानंतर कारचा नंबर (MH.१६ CY ७०१४) लिहून घेतला. आणि नंतर ती कार तेथून डाव्या साईडला टर्न मारुन पुणे हायवे रोडला गेली.
त्यानंतर विद्यार्थिनीने तातडीने वडीलांना फोनवरुन घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलांनी शिरूर पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करीत आहेत.