पुणे : महाशिवरात्र हा सण संपूर्ण भारतात करतात. या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची उपासना केली जाते. शिवपिंडीची फक्त पूजा आणि अभिषेक न करता, शिव हे तत्त्व आत्मसात करण्याचा उत्तम आणि मंगल दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. या वर्षाची महाशिवरात्री आज शनिवारी (ता.१८ फेब्रुवारी) आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला केदार, शंख, षष्ठ, ज्येष्ठ आणि सर्वार्थ सिद्धयोग मिळून पंचमहायोग होत आहे. महाशिवरात्रीला असे ७०० वर्षांनी अत्यंत शुभ व दुर्लभ महायोग जुळून आले आहेत. यंदाच्या महाशिवरात्रीला नेमक्या कोणत्या तिथी व शुभ मुहूर्तावर शिवभक्तांना लाभ होण्याची शक्यता आहेत. ते जाणून घेऊ या.
ज्योतिषशास्त्रानुसार, १३ फेब्रुवारीला सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला, त्यानंतर १५ फेब्रुवारीला शुक्र देव मीन राशीत दाखल झाला आहे. त्यामुळे शंकराची पुजा केल्याने त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. महाशिवरात्रीला दिवस रात्र शंकराची पूजा करता येते. महाशिवरात्रीला रात्रीच्या चार तासात भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्यामध्ये रात्रीच्या आठव्या मुहूर्तात निशिथकाल ही पूजा उत्तम आहे, असे ज्योषिशशास्त्रानुसार सांगितले आहे.
महाशिवरात्री पूजेचा चार तासांचा मुहूर्त
१) रात्रीचे पहिले प्रहर: शुक्रवारी (संध्याकाळी ६.२१ ते रात्री ९.३१)
२) रात्रीचा दुसरा टप्पा: शुक्रवारी (रात्री ९.३१ ते १२.४१)
३) रात्रीचा तिसरा टप्पा: शुक्रवारी-शनिवारी (रात्री १२.४२ मिनिटांपासून ३.५१)
४) रात्री चौथा प्रहार: शुक्रवारी-शनिवारी (३.५२ ते सकाळी ७.०१ मिनिटे)
महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे?
महाशिवरात्रीच्या उपवासाला पांढरे मीठ सुद्धा टाळले जाते. याऐवजी आपण सैंधव मीठाचा पर्याय वापरू शकता. यादिवशी हलका फलाहार घ्या, ड्रायफ्रूट्स किंवा साबुदाण्याच्या खिचडीचे सेवन करू शकता.
दरम्यान, शिवपुराणाच्या कथेनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि भगवान विष्णू आणि ब्रहराजी यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली. तर दुसऱ्या कथेनुसार महाशिवरात्रीच्या तिथीला देवी पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता, अशी मान्यता आहे.