विशाल कदम
लोणी काळभोर : पुणे येथील साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील भाजी मंडईत रॅली काढून गोवर व साथीच्या रोगांचे फैलाव रोखण्यासाठी मंगळवारी (ता. १४) आणि बुधवारी (ता.१५) दोन दिवस आरोग्य शिबीर राबवून जनजागृती केली आहे.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व भाजी मंडईत विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. १४) ”गोवर” या विषयावर पथनाटय सदर करून उपस्थित नागरिकांना माहिती सांगितली. या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी गोवर आजार कसा होतो? आपण हा आजार कसा टाळू शकतो. आणि हा आजार झाला तर त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
यासंदर्भात विद्यार्थ्यांनी नागरिकांना माहिती सांगून जनजागृती केली. तसेच विद्यार्थिनी एका सुंदर प्रकल्पाद्वारे “जागतिक तापमान वाढ” व त्याचे परिणाम याबद्दलही माहिती सांगून नागरिकांचे प्रबोधन केले.
त्यानंतर बुधवारी (ता.१५) विद्यार्थ्यांनी लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गर्भवती मातांना प्रसुतीपूर्वी, प्रसुतीदरम्यान व प्रसुतीनंतर स्वत:ची आणि बाळाची कोणती आणि कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात माहिती दिली.
गर्भावस्थेमध्ये होत असलेला त्रास वा दुखणी जर अंगावर काढली, तर त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी झालेले निदान हे बाळामध्ये कोणत्या प्रकारचे व्यंग आहे का, याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मदतगार ठरते. या वैद्यकीय चाचण्यांची गरज ही योग्य वेळी लक्षात घेऊन डॉक्टरांनी दिलेल्या सल्ला व सूचनांचे तंतुतंत पालन करावे. अशी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली.
दरम्यान, प्रत्येक मातेने आपला रक्तदाब तपासून घ्यावा, रक्तदाब १२० -८० असावा. प्रत्येक मातेने बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे. बाळाची हालचाल अठरा आठवड्यानंतर मातेला कळते.
बाळाच्या हालचालीवर मातेने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच गर्भवती स्त्रीने आपले हिमोग्लोबिन दर तीन महिन्यांनी तपासणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिन हे नेहमीकरिता अकरा ग्रॅमच्यावर असणे गरजेचे असते. लघवीची तपासणी करून अल्बोमीन लघवीमध्ये आहे का हे तपासून घेणे गरजेचे असते. असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले आहे.
या आरोग्य भिबिरात मध्ये साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या एकूण ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी प्राध्यापिका नेहा बीटे, विद्या आढाव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. तर या शिबिरासाठी लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले.