अजित जगताप
सातारा : बोंबाळे ता. खटाव येथे श्री सिद्धनाथ गोसावी बुवा मंदिर परिसरात देशभर विखुरलेल्या काळे कुटुंबियांच्या वतीने वार्षिक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल दोन वर्षांनंतर झालेल्या या यात्रेला भाविकांचा उत्साह दिसून आला.
माघ पौर्णिमेच्या चतुर्थीला ही यात्रा भरते. या यात्रेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश येथील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या भाविकांच्या देणगीच्या रूपाने येथील मंदिर उभारण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील भां येथील पुजारी वर्षभर पूजाअर्चा करतात. यात्रेच्या सायंकाळी गजी ढोल हा नृत्याचा कार्यक्रम होतो.
यंदाच्या वर्षी लाखभर रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. सध्या वाघजाई मंदिर येथील शिखराचे काम सुरू आहे. यासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केले आहे. सदरच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता व विद्युत पुरवठा तात्पुरता केला असला तरी भक्तांसाठी कायमस्वरूपी नागरी सुविधा उपलब्ध करावी. अशी मागणी रविराज काळे, विक्रमसिंह काळे, विश्वास काळे, बाळासो काळे, संजय काळे, विजय काळे, चंद्रकांत काळे यांनी केली आहे.
बोंबाळे येथील सिद्धनाथ गोसावी बुवा मंदिराची आख्यायिका
धनगर समाजातील काळे कुटुंबातील मुख्य पुरुष काळे हे खटाव तालुक्यातील एका गावात दिवसा गुरं राखण्याचे काम करत होते. त्यानंतर रात्री म्हसवड येथील श्री सिद्धीनाथाचे दररोज पायी जाऊन दर्शन घेत होते. वाढत्या वयोमानानुसार त्यांना म्हसवडला जाणे अशक्य होऊ लागले. याची जाणीव झाल्यानंतर श्री सिद्धिनाथ यांच्याकडे प्रार्थना करून सांगितले की, आपले दर्शन घेण्यासाठी जवळ यावे. त्यानुसार श्री सिद्धीनाथांनी एक अट घातली. तुमच्या पाठीमागून येतो परंतु ज्या ठिकाणी तुम्ही वळून पहाल. त्या ठिकाणी मी थांबेन. त्यानुसार बराच वेळ चालून आल्यानंतर काळे यांनी पाठीमागे पाहिल्यानंतर श्री सिद्धनाथ यांनी त्याच जागी निवास केला. अशी आख्यायिका आहे.