सागर जगदाळे
भिगवण : मदनवाडी ( ता. इंदापूर) येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे या वर्षीदेखील करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे सतरावे वर्ष असून शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा देखील करण्यात येतो.
मदनवाडी हे आध्यात्मिक गाव अशी ओळख निर्माण करत असून गावामध्ये अनेक हरिनाम सप्ताह होत असतात. हा सप्ताह सर्वांसाठी मार्गदर्शक असा आहे. हा सप्ताह मदनवाडी येथील महादेव मंदिरात दरवर्षी करण्यात येतो ह.भ.प. शिवाजी महाराज पहाणे आणि ह.भ.प. रमेश महाराज भोसले हे या सप्ताहाला मार्गदर्शन करत असतात.
रविवार दिनांक १२ फेब्रुवारीपासून शनिवार दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत सप्ताह चालणार आहे. यावेळी पहिले कीर्तन ह. भ. प. हरी महाराज कदम तर दुसऱ्या दिवशीचे किर्तन पांडुरंग महाराज सातपुते यांचे होणार आहे तर किर्तनाचे तिसरे पुष्प शामसुंदर महाराज ढवळे, चौथे पुष्प दत्तात्रय महाराज गलांडे, पाचवे पुष्प शिवाजी महाराज पहाणे आणि शनिवारी काल्याचे किर्तन ह.भ.प.संजय महाराज पाचपोर हे करणार आहेत.
या किर्तनासाठी अण्णासाहेब देवकाते, दुधाराम सकुंडे,लालासो सकुंडे, शरद चितारे जेष्ठ पत्रकार दादासाहेब थोरात आणि मदनवाडी गावचे सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर यांचे तर काल्याचे किर्तनासाठी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सरपंच तुकाराम बंडगर आणि धनाजी थोरात यांचे सौजन्य आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्त होत असलेल्या या हरिनाम सप्ताहात दरवर्षी प्रमाणे दररोज अन्नदानाची प्रथा आहे. या अन्नदानासाठी गावातील अनेक अन्नदाते मदत करतात. जन्म मृत्युच्या फेरीतुन मुक्त होण्यासाठी पाप आणि पुण्याचा तराजु एकसारखा असला पाहिजे आणि त्यातही अन्नदानाला खुप महत्व असल्याने मदनवाडीकर या सप्ताहाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात.
अन्नदान हे एखाद्याच्या कुवतीनुसार आणि सोयीनुसार केले पाहिजे. यामुळे परम कल्याणाची प्राप्ती होते. विशेषतः अन्नदान हा जीवनातील आदराचा घटक आहे. म्हणून गरजूंना अन्नदान केले पाहिजे, अन्नदान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि इहलोक आणि परलोकात सुख प्राप्त होते.
या भावनेने काल्याच्या महाप्रसादासाठी सर्जेराव रामचंद्र बंडगर हे संपूर्ण अन्नदान करत असतात. यामुळे गावांमध्ये होत असलेला हा अध्यात्मिक सोहळा अतिशय आदर्श असा आहे या अध्यात्मिक सोहळ्याचे नियोजन रमेश नरुटे आणि संयोजक मंडळी करत असतात.