पुणे : मोशी येथील तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील सोनसाखळी व रोकड लुटणाऱ्या दोन चोरट्यांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
योगेश आत्माराम घाटूळकर (वय २४, रा. मु.पो. केळगाव, आळंदी, ता. खेड), माधव पंढरी ताले (वय २६, रा. आळंदी पोस्ट ऑफिसजवळ, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी संजय भऊलाल गडकर (रा. गायकवाड वस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गडकर हे मोशी – सस्तेवाडी येथे रस्त्यालगत थांबून मोबाईलवर बोलत होते. यावेळी आरोपी मोटारीतून तेथे आले. इथे काय करतो, आम्ही काय बोलतो, याकडे लक्ष देता येत नाही का, असे म्हणत गडकर यांना मारहाण केली.
दरम्यान, त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व रोकड असा २६ हजाराचा ऐवज लुटला. गडकर यांनी हा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी मोटारीच्या क्रमांकावरून तपास करून चोरट्यांना जेरबंद केले आहे.