पुणे : माळढोक पक्ष्याला वाचविण्यासाठी पुणे वन विभागाने राज्यातील पहिले ‘माळढोक संवर्धनात्मक प्रजनन केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान सरकारकडे माळढोक पक्ष्याची अंडी आणि एक नर-मादीची जोडी द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाचे काम सुरू असून, लवकरच तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्यातील पन्नास एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. नान्नज अभयारण्य खास माळढोक पक्ष्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत माळढोकची संख्या झपाट्याने कमी होऊन सध्या तेथे केवळ एकच पक्षी वास्तव्यास आहे.
माळढोकचे अस्तित्व असलेल्या सर्वच राज्यांमध्ये ही परिस्थिती असून, यावर पक्ष्याचे अस्तित्व राखण्यासाठी केंद्रीय वन्यजीव संवर्धन संस्थेने ‘संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्पा’चा पर्याय दिला आहे. या पूर्वी गिधाडांच्या संवर्धनांसाठी केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयाने हा मार्ग स्वीकारला होता.
राज्यात माळढोक संवर्धनाची संकल्पना २०१२मध्ये मांडण्यात आली. राज्य वन्यजीव मंडळाने २०१४मध्ये या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला होता. एवढेच नव्हे, तर राज्य सरकारने प्रकल्प उभारणीसाठी निधीही जाहीर केला. मात्र, पुढे काहीच घडले नाही.
आता राज्यात एकच पक्षी राहिल्याने पुन्हा एकदा वन विभागाने प्रकल्पासाठी कंबर कसली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सहभागातून नान्नजमध्येच प्रजनन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, याबाबत पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण म्हणाले, ‘नान्नज माळढोक अभयारण्याचा समावेश पुणे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात होतो. काही दिवसांपूर्वीच आम्ही जागेची पाहणी केली आहे.
प्रकल्पासाठी ५० एकर जागा निश्चित केली आहे. प्रकल्पासाठी मोठे क्षेत्र आवश्यक असते. यामध्ये वैद्यकीय, संशोधन देखरेखीखालील क्षेत्र आणि पक्ष्याला मुक्तपणे वावरता येईल असा नैसर्गिक; पण बंदिस्त अधिवास राखीव ठेवला जातो.
संशोधन विभागात इनक्युटेबर, हॅचर, पिल्लांच्या संगोपनासाठी वेगवेगळे कक्ष असतात. यात पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक पूर्णवेळ कार्यरत असते.’ ‘सध्या जैसलमेर येथे याच प्रकारचा प्रकल्प कार्यरत असून, याच धर्तीवर राज्यातील पहिला प्रकल्प लवकरच साकारणार आहे.