लोणी काळभोर : फ्रेंडशीप करण्यासाठी नकार दिल्याने मेडीकलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला भररस्त्यात शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात मंगळवारी (ता.७) दुपारच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणी ही हडपसर परिसरातील एका मेडीकलमध्ये काम करीत आहे. नेहमीप्रमाणे तरुणी मंगळवारी (ता.७) मेडीकलमध्ये काम करीत होती. तेव्हा तेथे आरोपी तरुण आला. त्याने तरुणीला फ्रेंडशीप करशील का? अशी विचारणा केली. तेव्हा तरुणीने त्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने तरुणीला शिवीगाळ केली व निघून गेला.
दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास तरुणी जेवण्यासाठी घरी पायी जात असताना, आरोपीने तरुणीचा पाठलाग केला व काही अंतर गेल्यानंतर पुन्हा विचारणा केली. तरूणीने तेव्हाही त्याला नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या तरुणाने भररस्त्यात तरुणीला मारहाण केली. आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.