पुणे : निमोणे (ता. शिरूर) येथील मोटेवाडी रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात ७२ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी अकराच्या दरम्यान शाळकरी मुलांना माजी सरपंच नानासाहेब काळे यांच्या उसाच्या शेतात विवस्त्र मृतदेह दिसला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
मनोहर चंदरराव शितोळे (रा. सांगवी सांडस, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ४) सकाळी अकराच्या दरम्यान शाळकरी मुलांना माजी सरपंच नानासाहेब काळे यांच्या उसाच्या शेतात विवस्त्र मृतदेह दिसला. यावेळी त्यांनी या घटनेची माहिती गावातील नागरिकांना सांगितली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पाटील इंदिरा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन, या घटनेची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दिली. तब्बल चार तास पोलिस पथक गावात तळ ठोकून होते.
पोलिसांना मृतदेहाच्या जवळ कपडे मिळाले. त्यावरून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. ज्या व्यक्तीचा खून झाला आहे त्या व्यक्तीची मुलगी निमोणे गावात दिली आहे. बहीण, मेव्हुणीपण निमोण्यातच दिल्या आहेत. त्यांचा खूप मोठा गोतावळा निमोणे गावात असल्यामुळे अनेकदा शितोळे यांचा मुक्काम निमोणे गावातच असायचा, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून आली.
दरम्यान, गुरुवारी (ता.२) रोजी रात्री साडेआठनंतर ते कोणालाही दिसले नाहीत. मात्र, मोटेवाडी रस्त्याने जाणार्या शाळकरी मुलांना त्यांचा मृतदेह शनिवारी (ता. ४) रोजी माजी सरपंच नानासाहेब काळे यांच्या शेतात दिसला. खून नक्की कुणी केला याबाबत पोलिस तपास करीत आहेत.