सातारा : साताऱ्यात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पोलीस पत्नीनेच सुपारी देऊन काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यासह ७ जणांना अटक केली आहे.
अमित आप्पासाहेब भोसले (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अभिषेक विलास चतुर (वय-२७, रा. नांदगिरी, ता. कोरेगाव), शुभम हिंदूराव चतुर (वय २७, रा. कोरेगाव, सध्या रा. पुणे), राजू भीमराव पवार (वय २६, रा. सातारा), सचिन रमेश चव्हाण (वय २२, रा. मुळशी, पुणे), सूरज ज्ञानेश्वर कदम (वय २७, रा. खेड, ता. सातारा; सध्या रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पत्नी शुभांगी भोसले व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भोसले हे त्यांच्या मैत्रिणीसोबत वाढे फाट्यावरील एका हॉटेलमध्ये २४ जानेवारी रोजी रात्री पावणे बारा वाजता जेवणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडण्यात आल्या. यातूनही ते बचावल्याने होते. त्यानंतर त्यांचा गळा कापून खून करण्यात आला होता. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.
सदर गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, तसेच पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचा सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या.
त्यानुसार संशयितांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील तपास पथक तयार केले होते
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना आरोपी गोव्यात असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत शुक्रवारी (ता. ३) मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाला गोव्यात पोहोचण्यास वेळ लागणार होता. त्यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी ही माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधिन वाल्सन यांना दिली. त्यांच्या मदतीने ६ आरोपींना तातडीने गोव्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, मृताच्या पत्नीकडून सुपारी घेऊन हा खून केल्या असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर मृताची पत्नी, तसेच एक विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. मृताच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, पतीच्या अनैतिक संबंध व त्याच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सुपारी दिल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.