पुणे : चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे सुनिल मोरे यांचे शुक्रवारी (ता. ०३) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूने पुणे शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे हे जेवण करण्यासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. यामध्ये मोरे यांची प्राणज्योत मालवली. सुनील मोरे यांना नुकतीच खात्यांतर्गत पदोन्नती मिळाली होती. मोरे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.
दरम्यान, त्यांच्या अचानक जाण्याने पुणे पोलीस दलासह चतु:श्रृंगी वाहतूक विभागावर शोककळा पसरली आहे. सुनील मोरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.