बारामती : चांदगुडेवाडी (ता. बारामती ) ग्रामपंचायत हददीत धरणवस्ती येथील कन्हा नदीपत्रातून होत असलेल्या बेकायदा वाळु उत्खननाच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा रविवारी (ता.२९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी तब्बल ५० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एकासह ४ वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
अमोल शंकर सणस (वय ४६, रा. उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे), महादेव बाळु ढोले (वय ३८, रा. मोरगाव चौयथाळवस्ती, ता.बारामती), मनोहर शामराव चांदगुडे (वय ४६, रा. धरणवस्ती, चांदगुडेवाडी ता. बारामती, जि. पुणे), स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे (वय २७) आणि विठठल तानाजी जाधव (वय २५, दोघेहीरा. आंबी खु, ता. बारामती, जि.पुणे) असे निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे व त्याचे पथक मोरगाव परिसरात सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना, चांदगुडेवाडी (ता. बारामती) गावच्या हददीत धरणवस्ती येथे कन्हा नदीपात्रात इसम नामे मनोहर चांदगुडे आणि विकास चांदगुडे हे दोघे त्यांच्या साथीदारासह बेकायदा बिगरपरवाना वाळु उत्खनन करून चोरून नेत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी दाखल झाले असता, पोलिसांना तेथे एक लाल रंगाचा ट्रक मिळुन आला.
सदर ट्रकवरील चालकास ट्रकमधील बाबाबत विचारणा केली असता, त्याने सदरची वाळु हि तुषार चांदगुडे व त्यांचे दोन भागीदार यांच्याकडुन भरून आणली असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांना दोन जे.सी.बी तेथील दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळु उत्खनन करून चोरून भरत असताना आढळून आले. व दोन ट्रॅक्टर डंपींग ट्रॉलीसह मिळुन आले.
दरम्यान,आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागताच, एक जेसीबी चालक अंधाराच फायदा घेवुन पळून गेला व त्याचे इतर तिन साथीदार लाल रंगाचे चारचाकी वाहनामध्ये बसुन पळून गेले. त्यानंतर जागीच मिळुन आलेल्या लोकांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी वरील ५ आरोपींची नावे सांगितली आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल ४७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये जेसीबी, ४ ट्रॅक्टर व ट्रॉली व ट्रक यांचा समावेश आहे. तर वरील ५ आरोपींच्या विरोधात निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्वागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहाय्यक फौजदार कारंडे, कोकरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, विजय कांचन, एकशिंगे, अहिवळे, नवले तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेलार, पोलीस कर्मचारी नाळे आणि जैनक यांच्या पथकाने केली आहे.