लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील “व्हॅली अँड फ्लॉवर्स” या चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसाला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अशी चित्रकार तसेच आयोजक सुनील व स्वाती काळे या दाम्पत्यांनी माहिती दिली आहे.
या चित्र प्रदर्शनाचा सोहळा प्रमुख पाहूणे निवृत्त जनरल मॅनेजर डॉ. यु.एम. काळे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नलीनभाई देसाई व सुधा देसाई, नेहरू सेंटरच्या नीना रेगे मॅडम, मित्र मंडळी इतर अधिकाऱ्यांरीवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुनील काळे म्हणाले कि, कोणत्याही नव्या कार्यक्रमाची सुरुवात जोरदार व्हावी, भारदस्त व्हावी अनेक दिग्गज गाजलेल्या व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहावेत. त्यामुळे कार्यक्रमाला वजन प्राप्त होते व खूप प्रसिद्धीही मिळते. अशी सर्व कलाकारांची धारणा आहे. पण हे सर्व मनातले विचार प्रत्यक्षात मात्र उतरत नाहीत.
कारण त्या दिग्गजांपर्यंत पोहचण्याचा मार्ग खूपच कठीण असतो. त्यात ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसते, ज्याच्यांकडे कलाक्षेत्रात वलय नसते त्यांच्याकडे ही दिग्गज मंडळी पाठ फिरवतात.
त्याच्यांपर्यंत पोहचण्यासाठी जो मध्यस्थी असतो तो ऐनवेळी टांग मारतो आणि मग दिग्गज मंडळी भेटणे अवघड होते. ते एक दिवा स्वप्न ठरते. मी या अश्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे चित्रप्रदर्शनाचे भव्यदिव्य उद्घाटन टाळतो. आणि साध्या घरघुती रिवाजाप्रमाणे समारंभ पार पडतो. असे काळे यांनी सांगितले.
पुढे बोलताना काळे म्हणाले, कार्यक्रमानंतर सहज बाहेर फिरत होतो तर नेहरू सेंटरचे मिलिंद तावडे साहेबांनी सांगितले कि, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे येत आहेत. आणि अचानक नेहरू सेंटरच्या प्रवेशद्वारावर एक मोठी काळ्या रंगाची गाडी थांबली आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब उतरले.
माझ्या समोरच ते गाडीतून उतरले. त्यावेळी मी चकीतच झालो. आणि मग पुढे होवून नमस्कार केला. आम्ही पतीपत्नी वाई पाचगणी परिसरातील चित्रकार असून त्या परिसरातील चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. तर तुम्ही याल का ? अशी विनंती केली व हातातील आमंत्रण पत्रिका दिली.
मी नेहरू सेंटरच्या अधिकाऱ्यांच्या मिटींगसाठी आलो आहे जमले तर परत जाताना येतो असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार पुढे निघून गेले. त्यानंतर लगेचच खासदार सुप्रिया सुळे यांचे आगमन झाले. त्यांनाही आमंत्रण दिले. त्यांनीही मिटींग नंतर बघू असे म्हणत घाईने लिफ्टच्या दिशेने प्रयाण केले. मी देखील गॅलरीच्या इतर अनेक जणांना भेटण्यात व्यस्त झालो. विसरूनही गेलो.
त्यानंतर एकदोन तासानंतर अचानक गॅलरीच्या प्रवेशद्वारावर माणसांची मोठी झुंबड उडाली. आणि पांढरीशुभ्र कपडे घातलेले शरद पवार व सुप्रिया सुळे हसत आत आले. “चला वाई, पाचगणीवाले, दाखवा आता तुमची चित्रे “असे म्हणत अर्धा तास दोघांनीही प्रत्येक चित्रांसमोर उभे राहून भरपूर गप्पा मारल्या .
पाचगणीतील टेबललॅन्डवरून काढलेल्या बिलिमोरीया स्कूलच्या चित्राकडे पहात ही शाळा पारशी माणसाची होती. टेबललॅन्डच्या थोडे पुढे गेल्यावर उंचावरून दिसते. मी गेलो होतो त्या पाईंटवर अशी माहीती सांगितली.
पारशी पाईंटच्या विहंगम व्हॅलीचे चित्र त्यानां विशेष आवडल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या माहितीच्या निवेदन फलकावर आता माणसांनी नद्या फार प्रदूषित केल्या आहेत. या वाक्यावर तुमचं निरिक्षण अगदी योग्य आहे. असे कौतुकाने सांगितले.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी स्वतः फोटो काढले व चित्रप्रदर्शनाचा व्हिडीओ स्वतः काढला. स्वातीच्या फुलांच्या व माझ्या जलरंगातील चित्रांचे कौतुक केले. सुप्रियाताई आणि पवार साहेबांनी पाठीवर हात ठेऊन प्रोत्साहन दिले व प्रेमाने निरोप घेतला .
मी कोणत्याही पक्षाचा पुरस्करता नाही. राजकारणापासून तर खूप खूप लांब आहे. फक्त टिव्हीवरच दिसणाऱ्या या दिग्गजानां सतत पाहिले होते. आज प्रत्यक्ष ग्रेटभेट झाली व आपल्या प्रदर्शनासाठी कोणीतरी मान्यवर मंडळी यावीत. ही इच्छा कोणताही मध्यस्थी न घालता, कोणतेही कष्ट न घेता अचानक योगायोगाने पूर्ण झाली. यापेक्षा आणखी वेगळा आनंद कोणता ?
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर चित्रप्रदर्शनाचा काढलेला व्हिडीओ प्रसिद्ध केला व अचानक अनोळखी लोकांचे अभिनंदनाचे फोनही येऊ लागले.
व्हॅली ॲन्ड फ्लॉवर्स ” या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसाला असा ऊत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व अनेक मान्यवरांच्या या प्रदर्शनाला दिलेल्या अचानक ग्रेटभेटी पुढील आयुष्यभर कायम लक्षात राहतील.
नवी चित्रे बनविण्यासाठी या आठवणी नेहमी प्रेरणा देत राहतील यात काही शंका नाही. असे चित्रकार तथा आयोजक सुनील व स्वाती काळे या दाम्पत्यांनी सांगितले. तसेच या प्रदर्शनाला शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी भेटी दिल्या. त्याबद्दल आम्ही दोघेही ऋणी असून, पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो.