पुणे : निवडणूक आयोगाने वेळोवेळी जाहीर केलेल्या मोहिमांमध्ये मतदार नोंदणी होत असते. मोबाईल ॲप व ऑनलाइन मतदार नोंदणीला अनेक मतदार प्राधान्य देत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. महाविद्यालयातील नवमतदारांनी स्वतःसह आपल्या कुटुंबियांना व सहकाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी व मतदानासाठी प्रोत्साहित करावे. असे आवाहन तहसीलदार अपर्णा तांबोळी यांनी केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नोंदणी अधिकारी सुरेखा माने, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ व फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश पवार, स्वाती कुलकर्णी, नारायण कुलकर्णी, नायब तहसीलदार कुंदा थोरात, दिव्यांग मतदार प्रतिनिधी मयुरी अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी नवमतदारांना शपथ दिली. या उपक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवडणूक कामकाजात उल्लेखनीय काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. तर यावेळी दिव्यांग मतदार मयुरी अत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी साप शिडी खेळाच्या माध्यमातून मतदान जनजागृती या अनोख्या खेळांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. खेळातील विजेत्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फर्ग्युसन महाविद्यालय येथील विद्यार्थिनी देवयानी महाजन यांनी केले.