शिक्रापूर : स्वतःची कार व बंगला पेटवून यात्रेत तमाशा बघणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती (ता. शिरुर) येथे घडली आहे.
प्रज्योत तांबे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे याचे आई वडील वाजेवाडी येथे गेले होते. त्यांतर ऐन यात्रेच्या दिवशी (ता.२४) रोजी सकाळी १०.३० रोजी प्रज्योत याने बंगल्याच्या बाजूला असलेली एम एच १२ ए जि ९४१८ हि कार पेटवून दिली. त्यानंतर बंगल्यामध्ये जाऊन बंगल्यात देखील आग लावून तो फरार झाला.
कारचे मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने चारही टायर तसेच एचपीच्या सिलेंडरने स्फोट झाला. या आगीत संपूर्ण कार, बंगल्यातील सर्व धान्य, कपडे यांसह काही वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आग विझवली.
दरम्यान आग लावून प्रज्योत तांबे गावामध्ये यात्रेत सुरु असलेला तमाशा पाहत बसल्याचे पोलिसांना समजताच सदर ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.