बीड : संक्रातीनिमित्त मैत्रीणींना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावयाचे होते. म्हणून वाणाचे सामान घरी घेऊन येत असताना झालेल्या अपघात महिला पोलिस हवालदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२०) घडली आहे. यामुळे बीड पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
माया श्याम जाधव (वय-४२, मुळ रा. लिंबागणेश, सध्या रा. धांडेनगर, बीड) असे मृत्यू झालेल्या महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माया जाधव बीड पोलिस दलातील पेठ पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदावर कार्यरत होत्या. माया जाधव यांनी घरी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी वाण आणण्यासाठी माया व त्यांचे पती श्याम जाधव हे मोटारसायकलवरून खरेदीसाठी बोहर गेले होते.
दरम्यान, वाणाचे सामान घरी घेऊन येत असताना, त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात माया जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. माया जाधव यांची उपचारादरम्यान शुक्रवारी प्राणज्योत मालवली.