शिरूर : पिंपरखेड (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. २०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी रेश्मा संतोष जाधव यांनी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरखेड (ता.शिरूर) हद्दीतील पंचतळे नजीक रेश्मा संतोष जाधव आपले सासू, सासरे, पती व मुलासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी (ता. १९) रोजी रेश्मा यांची सासू व सासरे हे दशक्रियेनिमित्त बाहेरगावी गेले होते.
पहाटे तीनच्या सुमारास अंगात निळसर जर्किंग, जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचे स्पोर्ट्सचे शूज, तोंडाला व डोक्याला मफलर असा पेहराव असणाऱ्या चार अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी तुमच्याकडे असलेले सर्व पैसे द्या, कपाटाच्या चाव्या कुठेत अशा प्रकारे धमकी देत हातातील विळ्यासारख्या दिसणाऱ्या हत्याराचा धाक दाखवत अंगावरील सर्व दागिने काढून देण्यास सांगितले.
घाबरलेल्या अवस्थेतील रेश्मा यांनी आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून दिले. तसेच चोरट्यांनी आपल्या हातातील कटावणीच्या साह्याने कपाटाचे लॉकर तोडून इतर काही दागिने जबरीने काढून घेतले.
सोन्याच्या दागिन्यांसह घरामागील गोठ्यात बांधलेली काळ्या रंगाची शेळी व पंधरा हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून घराला बाहेरून कडी लावून जाधव कुटुंबियांना घरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. यावेळी चोरट्यांनी त्यांचे मोबाईल चोरून नेल्याने इतरत्र कोणाशीही संपर्क करता आला नाही.
दरम्यान घटनास्थळी शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पो. हवालदार जनार्दन शेळके यांनी भेट दिली आहे.
तसेच या घटनेतील जबरी चोरी करणाऱ्या इसमांची ओळख पटण्यासाठी बोटांचे ठसे निर्देशित करणारे पथक पाचारण करण्यात येणार असून नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करत आहेत.