राहुलकुमार अवचट
यवत : वरवंड (ता. दौंड) येथील घरफोडीच्या गुन्हातील तब्बल १ वर्षापासून फरार असलेल्या अट्टल सराईताला यवत व दौंड गुन्हे शोध पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करून दौंड रेल्वे स्थानकातून सोमवारी (ता.१६) अटक केली आहे. दौंड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला २ दिवस पोलीस रिमांड दिली आहे.
चंद्रकांत उर्फ चंदर शिवाजी जाधव (वय ३५ वर्षे रा.वरवंड ता.दौंड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर जाधव याने वरवंड येथील एका घराच्या खिडकीचा कोयंडा काढून खिडकीतुन आत हात घालुन पर्समधील ४ ग्रॅम वजनाचे मनीमंगळसुत्र व रोख रक्कम नोव्हेंबर २०२१ ला चोरून नेली होती. तसेच आरोपीने महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केले होते. याप्रकरणी एका फिर्यादी महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर गुन्ह्याचा यवत गुन्हे शोध पथक तपास करीत असताना, आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर जाधव हा सोमवारी (ता.१६) दौंड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने यवत व दौंड गुन्हे शोध पथकाने दौंड रेल्वे स्थानकाच्या परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपी चंद्रकांत उर्फ चंदर जाधव याच्यावर यवत, दौंड व हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुन, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला दौंड प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला २ दिवस पोलीस रिमांड दिली आहे.
ही कारवाई यवत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, दौंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार संदीप कदम,गणेश मुटेकर, गुरू गायकवाड,अक्षय यादव सुभाष राऊत यांच्या पथकाने केली आहे.