पुणे : सायबेज कंपनीमध्ये संचालक असल्याचे सांगून त्याठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची ५ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका अटक केली आहे.
फरदीन फिरोज खान (वय-२२ रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (ता. १५) रोजी फिर्याद दिली आहे. सदर प्रकार १४ डिसेंबर २०२२ पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी फरदीन शेख याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना सायबेज कंपनीत संचालक असून त्याठिकणी तुम्हाला नोकरी लावतो असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांकडून अॅपल कंपनीचे 2 लॅपटॉप, आयपॅड, सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल, 2 आयफोन,वन प्लस मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 5 लाख 63 हजार 448 रुपयांचे साहित्य व पैसे घेतले.
दरम्यान, एक महिना झाला तरी नोकरी लावली नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी रविवारी (ता. १५) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी फरदीन शेख याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.