पिंपरी : महिला बचतगटांना प्रोत्साहन आणि नवोदितांना हक्काचे व्यासपीठ या संकल्पनेतून आयोजित केलेल्या ‘‘इंद्रायणी थडी- २०२३’’ जत्रेकरिता तब्बल ७ हजारहून अधिक इच्छुक स्टॉलधारकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन लकी ड्रॉच्या माध्यमातून यापैकी १ हजार स्टॉल वाटप करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जांची छाननी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जत्रेचे समन्वयक संजय पटनी यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी म्हणून लौकिक प्राप्त “इंद्रायणी थडी” जत्रेतील स्टॉल नोंदणीकरिता रविवारपर्यंत तब्बल ७ हजारहून अधिक इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून, तसेच शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी “इंद्रायणी थडी” जत्रेचे आयोजन केले जाते.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहा शेजारी गावजत्रा मैदानावर दि. २५ जानेवारी ते दि. २९ जानेवारी २०२३ दरम्यान पाच दिवस ही जत्रा होणार आहे. त्यासाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यावर्षी जत्रेमध्ये एकूण १ हजार स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ग्राम संस्कृती, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक दस्तावेज प्रदर्शन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती यासह नवोदित कलावंतांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही संजय पटनी यांनी सांगितले.
स्टॉल बुकिंगसाठी राज्यभरातून प्रतिसाद…
इंद्रायणी थडी जत्रेमध्ये सुमारे ४० प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. अबलावृद्धांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता व्यासपीठ निर्माण केले आहे. स्पर्धेचे ब्रॅण्डिंग, प्रशस्तीपत्रक, बक्षिसे, प्रमुख पाहुणे यांचे नियोजन केले आहे. या स्पर्धांसाठी नामांकीत संस्थांनी नोंदणी केली आहे. तसेच, स्टॉल वाटप करण्यासाठी ऑनलाईन लकी ड्रॉ करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्टॉल मिळालेल्या अर्जदारांना आयोजकांकडून संपर्क करण्यात येईल. त्याद्वारे स्टॉल नंबर, हॉल नंबर, नियम आणि अटींबाबत सर्व माहिती स्टॉलधारकांना कळवण्यात येईल, असेही समन्वयक संजय पटनी यांनी सांगितले.