दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर पोलीसांच्या सतर्कतेमुळे घरफोडी करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला इंदापूर शहरातील महतीनगर परिसरात गुरुवारी (दि.१२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
सुमित दगडु गर्गेवाड (वय २३ वर्षे, रा. मळवटी रोड, सिध्देश्वरगनर, लातुर जि.लातूर) आणि शंभु विक्रम बुधवाडे (वय २० वर्षे, रा. बाभुळगाव ता. बाभुळगाव जि.लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रविण बाबासाहेब भोईटे यांनी सरकारच्यावतीने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरूवारी दि.१२ रोजी रात्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्यातील पथक इंदापूर शहरात गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना शहरातील महतीनगर भागात दोन संशयित इसम निदर्शनास आले. तसेच त्यांच्याकडे बजाज कंपनीची काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल क्रमांक (एम.एच. २४ बीक्यू ९२२०) या क्रमांकाची दुचाकी वाहनही आढळून आले.
पोलिस आल्याची चाहूल लागताच दोन्ही तरुणांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतली. तसेच त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहन देखील जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी इंदापूर शहरात घरफोडी करण्यासाठी आले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींच्या विरोधात लातूर, उस्मानाबाद या पोलीस ठाण्यांसह कर्नाटक राज्यात देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रविण भोईटे, पोलीस शिपाई प्रवीण शिंगाडे, समाधान केसकर व इंदापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.