पुणे : सिगारेटचे पैसे मागितले म्हणून सराईतांनी पानविक्रेत्यावर तलवारीने वार करून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना कोंढव्यातील टिळेकरनगरमध्ये घडली आहे. ही घटना रविवारी (ता.८) रोजी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकणी कोढवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
साहिल रोहन आडके (वय. १८ ) आणि अलेस्टर अॅन्थोनी भोसले (वय. २०) अशी अटक करण्यात आलेल्या सराईतांची नावी आहेत. तर, अजय मनोजकुमार मिश्रा (वय – २२, रा. लक्ष्मीनगर ) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी अजय पानटपरी चालक असून टिळेकरनगमध्ये पानविक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी (ता.८) रोजी आरोपी साहिल आणि अलेस्टर यांनी त्यांच्याकडून सिगारेट घेतली. त्यानंतर अजयनी त्यांना पैसे मागितले. अजयने त्यांना पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे त्यांनी आमच्याकडे पैसे का मागतो, तुलाच ठारच करतो, असे म्हणत तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला.
” तु आम्हाला ओळखत नाही का, आमचे नाव गुगलवर सर्च कर, आम्ही खून केलेला आहे. तू आम्हाला रोज फुकट सिगारेट द्यायची, नाहीतर तुझे जगणे मुश्कील करून टाकेल”, अशी धमकी त्यांनी अजयला दिली. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सराईतांनी हातातील तलवारी हवेत फिरविल्या. आम्हीच इथले भाई आहेत, असे म्हणत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी साहिल अलेस्टर या दोन्ही सराईतांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.