लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणात कुटुंबासहित फिरण्यासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय शिक्षकाचा पोहताना दमछाक होऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया (वय ६२, रा. नेहरुनगर, कुर्ला, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून शिक्षक प्रेमप्रकाश भाटिया हे पवना धरण परिसरातील दुधिवरे गाव परिसरात कुटुंबासह पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास भाटिया हे पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. पोहता येत असल्याने ते खोल अंतरापर्यंत पाण्यात पोहत गेले. मात्र पोहताना त्यांना मोठ्या प्रमाणावर दमछाक होऊ लागली. त्यामुळे ते पाण्यात बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवदुर्ग संस्थेच्या पथकाच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. काही वेळच्या प्रयत्नानंतर त्यांनी भाटिया यांना पाण्याच्या बाहेर काढत रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात दाखल करून घेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पर्यटकांनी पाण्यात उतरताना काळजी घेऊन उतरावे, जीवावर बेतेल असे धाडस करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेने भाटिया कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लोणावळा परिसरात मुंबईहून अनेक जण पर्यटनासाठी येत असतात. पर्यटक न को ते धाडस करतात. त्यामुळे अशा घटना घडतात. पर्यटनाला येताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.