इंदापूर : घराच्या बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का लागून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंदापूर येथील अंबिकानगर परिसरात बुधवारी (ता.१४) दुपारच्या सुमारास घडली. या दुर्देवी घटनेमुळे इंदापूर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजवर्धन रविंद्र रजपुत (वय – १६ रा. अंबिकानगर, इंदापूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चर्तुसिंग बाबुसिंग रजपुत (वय-६३ रा.४० फुटी रोड इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजपुत यांच्या नवीन घराचे बांधकाम अंबिकानगर येथे सुरु आहे. बांधकामाला पाणी देण्यासाठी राजवर्धन तेथे गेला होता. तेव्हा पाण्याच्या नळाला इलेक्ट्रीक मोटर जोडत असताना राजवर्धन याला विजेचा झटका बसल्याने बेशुद्ध होऊन खाली पडला.
दरम्यान, नागरिकांनी राजवर्धनला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.