पुणे : पुण्यातून भोरमार्गे महाडला जाताना वरंध परिसरात वाघजाई मंदिर आहे. या परिसरात अनेक माकडे असतात. या माकडांना खायला देताना सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात पुण्यातील एका शिक्षकाचा ६०० फूट दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायं. पाचच्या सुमारास घडली.
या घटनेत अब्दुल कुदबुद्दीन शेख हे (मूळ रा. एरंडी कोरंगळा जि. लातूर) मृत्युमुखी पडले आहेत. ते सध्या कुटुंबासह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. नऊ तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक बचाव टीमने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल कुदबुद्दीन शेख हे त्यांच्या कुटुंबासह भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहत होते. तसेच ते (मंडणगड जि. रत्नागिरी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला होते. तर त्यांची पत्नी (करंजावणे ता. वेल्हा) येथे प्राथमिक शिक्षिका आहेत. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटात ते थांबले. व माकडांना खायला घालताना सेल्फी घेत असताना हा अपघात झाला. घटनास्थळी संबंधित व्यक्तीची MH 03 BE 7415 क्रमाकांची लाल रंगाची कार आढळली. अशी माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यावरून पुढील तपास करत पोलिसांनी त्यांच्या घरच्यांचा शोध घेतला.
दरम्यान, नागरिकांनी पोलीस प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर आज बुधवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास अंधारात आणि दाट झाडी झुडपांतून हा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला. महाडची साळुंखे रेस्क्यू टीम आणि भोरच्या सह्याद्री सर्च रेस्क्यू टीमकडून हे शोधकार्य करण्यात आले.