हडपसर : चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन गुंडाच्या टोळक्याने तरुणाला ‘तुझ मुंडक काढून त्याने फुटबॉल खेळतो की नाही बघ’ अशी धमकी देऊन कोयत्याने वार करुन व हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
वैभव टॉकीजच्या मागे कामठे मळा येथे सोमवारी (ता. २६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी विजय अमृत सोनार (वय -२०, रा. इंदिरानगर, वैदवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनोद बंदिछोडे (वय २४, रा. कामठेमळा, हडपसर) याला अटक केली असून त्याचे साथीदार सिद्धु बंदिछोडे (वय-२१, रा. पांढरेमळा, हडपसर व इतर दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनार व बंदिछोडे यांच्यात सोमवारी भांडणे झाली होती. यावेळी सोनार व त्यांचे मित्र राहुल मुळेकर, सचिन चांची असे बोलत जात होते. यावेळी विनोद बंदिछोडे व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीचे मित्र सोडवण्यास आले असताना त्यांना ही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांना हॉकी स्टिकने मारहाण केली.
विनोद बंदिछोडे याने कोयता काढून तू परवाच्या दिवशी माझ्याकडून वाचलास आत्ता तुझ मुंडक काढून त्याने फुटबॉल खेळतो की नाही बघ असे बोलून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादीने वार चुकवून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला.
हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनोद बंदिछोडे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.