लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘फायर नाईट कॅम्प’ मध्ये शनिवारी (ता.२४) खूप मोठी धमाल केली आहे.
रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ‘फायर नाईट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात इयत्ता ६ वी ते दहावी पर्यंतच्या सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कॅम्पमध्ये मुलामुलींसाठी भाकरी बनविण्याची अनोखी स्पर्धा ठेवण्यात आली होती. आपल्या आईने आपल्यासाठी अतिशय कष्टाने आणि मायेने तयार केलेल्या भाकरीचे महत्त्व मुलांना कळावे आणि त्यांनी फास्ट फूड न खाता भाजी भाकरी या पौष्टिक न्याहारीला पसंती द्यावी हा या उपक्रमामागील हेतू आहे.
या भाकरी स्पर्धेमध्ये इयत्ता नुसार विजेते ठरलेल्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. यावेळी ज्वारीची ताटवे, हरभरा आणि स्वीटकॉर्नचे कणीस या विविध वाणांचा मनमुराद आनंद देणारी ‘हुरडा पार्टी’ ही भरविण्यात आली होती.
भाकरीसाठी बनवलेल्या चुलीच्या निखार्यावर भाजलेल्या या गावरान वाणांची मेजवानी अनुभवताना मुले अतिशय उत्साही होती. या वेळी स्कूलच्या वतीने वेगवेगळ्या वाणांमधून मिळणारी जीवनसत्त्व याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. व कडधान्यांचे नियमित सेवन करण्यास सांगण्यात आले.
रात्रीच्या वेळी निरभ्र आकाश न्याहाळत असताना विद्यार्थ्यांना स्कूलच्या वतीने अवकाश निरीक्षणाविषयी माहिती देण्यात आली. जागतिक व भारतीय अवकाश संशोधकांची व संशोधन मोहिमांची महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रात्रीच्या शिरशिरणाऱ्या थंडीत उबदार शेकोटी भोवती रिंगण करून खेळलेल्या म्युझिक बॉल सारखे खेळ आणि अतिशय जोषात झालेल्या गाण्यांच्या भेंड्यानी रात्रीच्या अंधारातही बालचमुंचा उत्साह नजरेत भरत होता. रात्रीच्या रुचकर जेवणाची मेजवानी स्कूलच्या वतीने देण्यात आली. जेवणानंतर बनविलेल्या मसाला दुधाने आणखीच रंगत वाढली.
दुसर्या दिवशी रविवारची (ता.२५ सुरुवातच मुळात पहाटे ६ वाजता योगा व ध्यानधारणा शिबिराने झाली. त्यानंतर मुलांनी शिक्षकांसमवेत रामदरा या पर्यटन स्थळी ट्रेकिंग करण्याचा आनंद घेतला. अतिशय उत्साहात आणि आल्हाददायक वातावरणात ‘नाईट फायर कॅम्प’ हे शिबीर पार पडले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रेनबो इंटरनॅशनल स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
दरम्यान, शाळा आणि घर या मध्ये दिवसभर व्यस्त असलेल्या मुलामुलींना शालेय शिस्त आणि घरातील मोकळेपणा यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि शाळेविषयी आपुलकी निर्माण होण्याविषयी अशा उपक्रमांची गरज असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. त्यामुळे रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या या उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे.