सोलापूर : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे युवराज कृष्णा भालेराव (वय- ५६) यांचे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
ही घटना शुक्रवारी (ता. २३) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुट्टीसाठी मामाच्या घरी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. युवराज भालेराव यांच्या मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील संत निरंकारी मठ, सांगोला रोड येथे राहणारे तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. युवराज भालेराव हे मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे दोन दिवस मामाच्या घरी राहण्यासाठी आले होते.
शुक्रवारी सकाळी अचानकपणे चक्कर येऊन ते खाली पडले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, पोलीस खात्याअंतर्गत नुकत्याच झालेल्या पदोन्नतीमध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या पश्चात दोन अविवाहित मुले व पत्नी असा परिवार आहे. युवराज भालेराव यांच्या आकस्मित निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.