पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार याद्या देखील दुरुस्त केल्या जात आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात सुमारे ९४००० मतदार एकाच चेहऱ्याचे असल्याचे उघड झाले आहे.
तसेच , एकाच मतदाराचे विविध मतदार याद्यांत नाव असल्याचे देखील भरपूर प्रकार आढळले आहेत. अशा याद्यांचा आणि मतदारांचा शोध घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात असे तब्बल ४ लाख ६७ हजार ४९९ मतदार आढळले आहेत.
या प्रक्रियेत एकाच चेहऱ्याचे छायाचित्र असलेले, एकसारखी नावे असलेले मतदार आहेत. त्यांच्या पत्त्यावर जाऊन खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे एक नाव मतदार यादीत ठेऊन अन्य नावे वगळली जाणार आहेत.
दरम्यान, काही लोक स्थलांतर करतात किंवा राहण्याची जागा बदलतात. अशा वेळी ते लोक नवीन ठिकाणी मतदार नोंदणी करतात आणि मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करतात. पण, ते आपल्या जुन्या मतदार यादीतील नाव काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. त्यामुळे त्यांची नावे दोन वेळा होतात.