पुणे : घरगुती वापराचा सिलेंडर बदलत असताना सिलेंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत पती-पत्नी जखमी झाल्याची घटना धायरी परिसरातील गणेश नक्षत्र सोसायटीमध्ये घडली आहे.
आरती राहुल साळवी (वय -३७) व राहुल दिलीप साळवी (वय-४०), रा. दोघेही रा. दोघेही, डी एस के विश्व, गणेश नक्षत्र सोसायटी) असे या घटनेत जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल साळवी व त्यांची पत्नी आरती हे धायरीतील डी एस के विश्व परिसरातील गणेश नक्षत्र सोसायटीत राहतात. शनिवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरती किचनमध्ये स्वयपांक करीत होत्या. या वेळी सिलेंडर संपल्याने त्या नवीन सिलेंडर जोडत असताना मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली. जवळच असलेल्या पणतीमुळे आग लागली. आरती या भाजल्याने त्यांना वाचविण्यासाठी गेलेले राहुल हेही त्यात भाजले.
अग्निशमन दलाला याची माहिती मिळता वडगाव खुर्द येथील दत्तात्रय नवले अग्निशमन केंद्राच्या जवानानी तत्काळ घटनास्थळी जाऊन आग विझविली. या घटनेत स्वयंपाक घरातील भिंतीला तडे जाऊन घरगुती साहित्याचे बरेच नुकसान झाले. अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल शिवाजी मुजूमले, जवान भरत गोगावले, शिवाजी आटोळे विक्रम मच्छिंद्र, औंकार लोखंडे, आदित्य मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.