पुणे : सोसायटीच्या १७ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षासह ९ जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी राजेंद्र सीताराम कांबळे (वय 52, रा. पाषाण, पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सोसायटीचे अध्यक्ष सुमित भाटिया, राजेश रमन, सचिव नईम इकबाल मिर्झा, व्यवस्थापक सुरेश यादव, व्यवस्थापक गोविंद चितळकर, लेखापाल विजय खटके, प्राधिकृत अधिकारी जितेंद्र विटकर, व्यवस्थापक आणि चैतन्य वॉटर सप्लायर्सच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील ओमेगा पॅराडाईज सोसायटीच्या फेज एक सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेच्या सभासदांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोसायटीच्या कामासाठी दिलेल्या मेन्टेनन्सच्या रकमेतून १६ लाख ५९ हजार४८० रुपयांचे व्हाउचर, चलन व बिलाद्वारे गैरव्यवहार केला आहे. असा आरोप कांबळे यांनी केला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.