बीड : येथील एका बीयरबार व हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिची एक झलक आणि डान्स पाहण्यासाठी तरुणाईने फुल्ल गर्दी करताना प्रचंड राडा घातला. याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याने सुमारे अर्धा तास बीड परळी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेवटी पोलिसांना बाळाचा वापर करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील एका बीयरबार व हॉटेलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या गौतमी पाटील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याने तरुणाईने तिला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र क्षमतेपेक्षा जास्त गर्दी या कार्यक्रमाला झाल्याने आयोजकांची भंभेरी उडाली. त्यामुळे आयोजकांना कार्यक्रम अर्ध्यातून बंद करण्याची वेळ आली.
कार्यक्रम अर्धवट राहिल्याने तरुणाईने हूल्ल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करताना गर्दीवर बाळाचा वापर करण्यास सुरुवात केली. यावेळी सौम्य प्रकारचा लाठीमार देखील करण्यात आला. गौतमी पाटील हिला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होणार याची आयोजकांना आणि पोलिसांना कल्पना असून देखील योग्य ते नियोजन करण्यात आले नसल्याचे याचा फटका मात्र, बीड परळी हा महामार्गावरील वाहतुकीला बसला. गर्दीच्या हुल्लडबाजीने बीड परळी हा राज्य मार्ग सुमारे अर्धा तास ठप्प झाला.
राज्यात सध्या गौतमी पाटीलची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून तिचा लावणीचा कार्यक्रम देखील वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. अश्लील हावभाग करत नृत्य करत असल्याने अनेक संघटनांनी अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा कालच्या प्रकाराने स्पष्ट झाले आहे.
आयोजक आणि पोलिसांना देखील गर्दीची कल्पना नसावी का? यासाठी केलेले उपाय परिणामकारक का ठरले नाहीत? अशा अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ सातत्याने वाढत असल्याने यावर पोलीस कशी भूमिका घेतात हे, पाहणे महत्वाचे ठरणार आहे.