पुणे: रात्रगस्तीवर असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुंडांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना वारजे परिसरातील गणपती माथा येथे गुरुवारी (ता.१५) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वारजेमाळवाडी पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिग्विजय ककाराम वाघमारे (वय-१९), व्यंकटेश प्रमोद पिळवणकर (वय-१९), अमोल निलेश पवार, लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे यांच्यासह आणखी तीन ते चार अज्ञात इसम अशा १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गोविंद भारत फड (वय-३९, पोलीस कर्मचारी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके आणि गोविंद फड हे कोथरूड विभागात रात्रगस्तीवर होते. यावेळी पोलिसांना गणपती माथा येथील रॉयल पान शॉप समोर गर्दी दिसल्याने पान शॉप बंद करण्यासाठी आणि गर्दी हटवण्यासाठी थांबले होते. गर्दीमध्ये असलेल्या आरोपींनी जमाव करून पोलीस कर्मचारी गोविंद फड यांच्या दिशेने दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणला. त्यानंतर शेजारीच असणाऱ्या गल्लीत ते पळून गेले.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस कर्मचारी गोविंद फड यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील आरोपी दिग्विजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.