पुणे : रॅपिडो बाईकच्या विरोधात पुण्यातील रिक्षा चालक पुन्हा एकदा एकवटले असून त्यांनी आपल्या आंदोलनस्थळी रिक्षा घटनास्थळी सोडून अनेक रिक्षाचालक निघून घेले आहेत. आंदोलनाची कुणकुण लागताच २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्याचा फौजफाटा घेवून पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे रॅपिडो बाईकच्या विरोधात रिक्षा चालकांनी पुकारलेले हे आंदोलन आक्रमक स्वरूप घेण्याची शक्यता आहे.
पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक हे घटनास्थळावर दाखल झाले असून त्यांनी अनेक रिक्षा चालकांना रिक्षा हटविण्याची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देवून काही रिक्षाचालक रिक्षा घेवून परतले. मात्र काही रिक्षाचालक मात्र आपली रिक्षा तिथेच सोडून निघून गेले. या रिक्षांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली होती.
ही कोंडी सोडण्यासाठी पोलीसानीच पुढाकार घेताना घटनास्थळी सोडलेल्या रिक्षा हटविण्याचे काम, पोलीसानीच सुरु केले आहे. त्यामुळे किमान वाहतूक सुरु झाली असून अजूनही काही प्रमाणात कोंडी सुरूच आहे. जे रिक्षाचालक आपली वाहने आंदोलनस्थळी सोडून गेले, त्यांच्या रिक्षा पोलीसाम्नी आरटीओ येथे घेवून गेले असून पुणे शहरातील संगमघाट ते आरटीओ तसेच जहांगीर हॉस्पिटल परिसर या रिक्षानी भरून गेला होता.
मागील आंदोलनावेळी पोलीसांनी या रॅपिडो बाईक संदर्भात भूमिका घेणार असल्याचे म्हटले होते, त्यावेळी या रिक्षा चालकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र पोलीसांकडून यावर कोणतेही पाउले उचलले नसल्याने पुन्हा एकदा रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता रिक्षाचालक हे आंदोलनाची भूमिका कशी घेतात हे पहाणे उत्सुकतापूर्ण असून यावर पोलीस देखील सतर्क झाले आहेत. त्यामुळे रॅपिडो बाईक व रिक्षा चालक यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.