लोणी काळभोर: अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दोन विद्युत रोहित्र फोडून लाखो रुपयांच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बेबी कॅनॉल परिसरात घडली असून मंगळवारी (ता.14) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथील बेबी कॅनॉलजवळ व लोणी काळभोरच्या शिवेशेजारी महावितरणाचे दोन विद्युत रोहित्र आहेत. या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणत शेती असल्याने विद्युत रोहित्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कृषी पंप चालतात. पण सोमवारी (ता.13) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडले. या विद्युत रोहीत्रामधून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या ताब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत. तर चोरीदरम्यान, विद्युत रोहीत्रामधून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली आहे.
मंगळवारी दिवसभर शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने हातातोंडांशी आलेला घास जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग अस्वस्थ आहे. बऱ्याच दिवसांच्या मंदी नंतर पालेभाज्यांचे दर वधारल्याने सुखावलेला बळीराजा विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने चिंतेत सापडला आहे. महावितरणने लवकरात लवकर येथील रोहित्रे बसवावेत आणि पोलीस प्रशासनाने या चोऱ्यांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..