पुणे : पिंपरी- चिंचवड शहरातील तळवडे भागातील त्रिवेणी हौसिंग सोसायटीत शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत १५ गाड्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. हि घटना रविवारी (ता. ११) मध्यरात्री घडली आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील त्रिवेणीनगर येथील त्रिवेणी हौसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये शॉर्टसर्किट झाले. शॉर्ट सर्किटनंतर चार्जिंग लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकला आग लागली. यात एकूण १५ इलेक्ट्रीक बाईक जळून खाक झाल्या आहेत. याबाबतची माहिती तळवडे अग्निशमन विभागाला मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
भीषण आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या चार व्यक्तींना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यात तीन मुलांसह ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. अग्निशमन विभागाचे मुकेश बर्वे, प्रतीक कांबळे, प्रदीप हिले, गोविंद सरवदे, दिनेश इंगलकर, अशोक पिंपरे यांसह इतर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, पहिल्या मजल्यावरील चार जणांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पार्किंगमध्ये इलेक्ट्रीक बाईक चार्जिंग लावली होती. तिथं, शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं अग्निशमन जवानांनी सांगितले.