पुणे : तैलबैला गडावर ट्रेक करण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ११) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
सोमनाथ बळीराम शिंदे (वय-२५, रा. कात्रज, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ शिंदे हा शनिवारी त्याच्या नऊ मित्रांसह टेलबैल गडावर ट्रेकसाठी गेले होता. रविवारी सकाळी गडावर पुढे जाऊन रोप, दोर बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या पाठीमागून दोरीच्या साहाय्याने उर्वरीत तरुण गडावर चढाई करणार होते.
सकाळी साडे नऊ वाजता ट्रेकिंगचा दोर तुटल्याने सोमनाथ थेट १०० फूट खाली कोसळला. त्यानंतर तेथून पुन्हा १०० फूट आणखी खाली कोसळला. त्यामुळे २०० फूट खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेस्कू करत सोमनाथ शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, सोमनाथचा जागीच मृत्यू झालेल्या त्याच्या मित्रांमध्ये एकच खळबळ उडाली. सोमनाथच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर सोमनाथच्या मृत्यूने कात्रज परिसरात शोककळा पसरली आहे.