पुणे – संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ठणकावत संविधानिक पदावर असो वा इतर कुणालाही महापुरुषांचा अवमान करण्याचे धारिष्ट्य होऊ नये यासाठी कायद्याची तरतूद करावी अशी मागणी केली.
सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचे प्रकार महाराष्ट्रात होत आहेत. विशेष म्हणजे संविधानिक व जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींकडून हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लोकसभेत शून्य प्रहरात या विषयावर बोलण्याची संधी मिळावी अशी विनंती खासदार डॉ. कोल्हे यांनी केली होती. परंतु दोन-तीन वाक्य बोलताच माईक बंद करण्यात आला. त्याही परिस्थितीत खासदार डॉ. कोल्हे यांनी तीव्र शब्दांत भावना व्यक्त करताना माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसविल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावले.
केवळ महाराष्ट्राच नव्हे तर अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज देव नसले तरी आम्हा शिवभक्तांसाठी देवापेक्षा कमी नाहीत. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह कोणत्याही महापुरूषांचा अवमान करण्याचे कुणाचेही अगदी संविधानिक व जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तींचेही धारिष्ट्य होऊ नये यासाठी संसदेने कायद्यात ठोस तरतूद करावी, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.