पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या (पेडपेंडींग) १ लाख ५ हजार कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या येत्या मार्च २०२३ पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू आहे. कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी सज्ज राहावे तसेच नादुरुस्त व जळालेले कृषी रोहित्र ताबडतोब बदलण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी यावेळी दिले.
पुणे येथील ‘प्रकाशभवन’मध्ये बुधवारी (दि. ७) आयोजित बैठकीत पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यांचा तसेच नादुरुस्त रोहित्र बदलण्याच्या कामाचा संचालक श्री. ताकसांडे यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की पैसे भरून प्रलंबित असलेल्या एकूण १ लाख ८० हजार १०६ कृषिपंपांना येत्या मार्च २०२३ पर्यंत नवीन वीजजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी गेल्या नोव्हेंबरपर्यंत ७४ हजार ८८१ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत तर उर्वरित १ लाख ५ हजार २२५ वीजजोडण्या येत्या मार्चपर्यंत देण्याचे नियोजन आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक २० हजार २५० कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर या महिन्यापासून मार्च २०२३ पर्यंत दरमहा ३० हजारांपेक्षा अधिक वीजजोडण्या देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. क्षेत्रीय कार्यालयांनी स्थानिक पातळीवर कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या देण्याची तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. वीजजोडण्या देण्याच्या क्षेत्रीय कार्यालय व कंत्राटदार एजंसीच्या कामावर मुख्यालयाकडून दैनंदिन लक्ष ठेवण्यात येत आहे असे संचालक श्री. ताकसांडे यांनी स्पष्ट केले.
सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. जळालेले किंवा नादुरुस्त झालेले रोहीत्र तात्काळ बदलण्याची कार्यवाही करण्यात यावी तसेच नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी अतिरिक्त स्वरुपात रोहित्र तयार ठेवावेत. मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑईलचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश यावेळी संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. बैठकीला पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.