पुणे : अमेरिकेतील क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात भागीदारी हक्क मिळवून देण्याच्या आमिषाने कोथरुड भागातील एका व्यावसायिकाची ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात मुंबईतील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, सिराज हुसेन, विक्रम चौधरी (सर्व रा. मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्याद व्यावसायिक कोथरुड भागात राहायला असून त्यांचे कार्यालय तेथे आहे. आरोपी पांडे, कृष्णा, खान, हुसेन, चौधरी यांच्याशी आरोपीची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. यूएसए क्रिकेट कौन्सिलकडे २०-२० प्रकारात क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या स्पर्धेस परवानगी मिळाल्यानंतर ४० टक्के भागीदारी हक्क मिळवून देतो, असे आमिष आरोपींनी व्यावसायिकाला दाखविले होते.
दरम्यान, फिर्यादी व्यावसायिकाकडून आरोपींनी वेळोवेळी ५५ लाख रुपये घेतले. स्पर्धेबाबत तक्रारादाराने विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार कोथरुड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपताळे करीत आहेत.