पिंपरी : मोशी येथील शिवाजीवाडी येथे मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेल्याने या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची पाणीपुरवठ्याची यंत्रणा तोकडी पडत होती. परिणामी, गृहनिर्माण संस्थेतील तसेच बैठ्या घरातील नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत होते. मात्र, ही पाणी समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्यास यश मिळाले आहे.
चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनकडे याबाबत रहिवशांनी तक्रार केली होती. यावर तात्काळ दखल घेत फेडरेशन मार्फत आमदार महेश लांडगे यांच्याकडे दाद मागण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठा अधिकारी यांची ‘ऑन दी स्पॉट’ बैठक घेण्यात आली.
पूर्वी अस्तित्वात असलेली पिंपरी-चिंचवड मनपाची पाण्याची जलवाहिनी छोटी असल्याने व या भागाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढल्याने ही छोटी लाईन एवढ्या मोठ्या लोकसंख्येस पाणी पुरवठा करण्यास अपुरी असल्याचे आमदार महेश लांडगे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आमदार लांडगे यांनी ही छोटी लाईन काढून मोठी लाईन टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड मनपाकडून ही छोटी लाईन बदलून मोठी लाईन टाकण्यात आली. त्यामुळे या परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थेतील तसेच बैठ्या घरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
मयुरेश्वर अपार्टमेंटचे अध्यक्ष रामेश्वर गालट म्हणाले की, गुरुदत्त कॉलनी मोशी येथील गृहनिर्माण संस्था तसेच येथिल बैठ्या घरांना पाण्याची खूप समस्या होती. पाणी खूप कमी प्रेशरने येत होते. त्यामुळे आम्हाला रोज टँकरने पाणी विकत घ्यावे लागत होते. आमदार महेश लांडगे यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून पाण्याची जुनी छोटी लाईन बदलून नवी मोठी लाईन टाकून दिली.त्यामुळे आता आमच्या परिसरात जोरात प्रेशरने मुबलक पाणी मिळत आहे. नागरिक यामुळे समाधानी आहेत.
चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, फेडरेशनच्या माध्यमातून ज्या-ज्या समस्या आमदार महेश लांडगे यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो. त्या सर्व समस्या आमदार लांडगे यांनी सोडवलेल्या आहेत. त्यामध्ये ओल्या कचऱ्याची समस्या असो किंवा पाण्याची समस्या असो आमदार महेश लांडगे यांनी ती सोडवली आहे. पाणी समस्या देखील आमदार महेश लांडगे यांनीच भामा आसखेड येथून २६५ एम.एल.डी.पाणी आणून चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारून सोडवलेली आहे.आम्हाला या राजकारणात व आरोप प्रतिआरोपात रस नाही.आमच्यासाठी पाणी समस्या कोणी सोडवली हे महत्वाचे आहे.