अजित जगताप
मुंबई : देशाच्या कानाकोपऱ्यातून कोणत्याही प्रकारची सुविधांचा पुरवठा न करता महापरिनिर्वाण दिनी लाखोच्या संख्येने अनुयायी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे आले होते. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परिस्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील हे ओळखलं पाहिजे. म्हणून आंबेडकरी समाजाने राजकीय दृष्ट्या एकत्र व्हा यावे असे नम्र आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथील विराट सभेत केले.
आज आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व मतदार तसेच जनता जागरूक झाली आहे. कोणा येडा गबाळ्याच्या मागे जाण्यापेक्षा राजकीय दृष्ट्या एकसंघ व्हा एकत्र या असं आव्हान रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंबेडकर यांनी करून सांगितले की, सध्या खाजगीकरण, महागाई, जातीयवाद, बेरोजगारी चे मोठे आव्हान उभे केले आहे. आजही गरीब, शोषित, कष्टकरी समाज्यावर अन्याय होत आहे. अल्पसंख्याक व दलित समाज्याला टार्गेट केले जात आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भावनिक होऊन काही होत नाही. त्यासाठी वैचारिक बैठक झाली पाहिजे. तरच त्यातून मार्ग मोकळा होणार आहे.
उत्तर भारतीय प्रभारी भाई सावंत म्हणाले, महामानवास अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे विचार पटले आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीला साथ मिळाली आहे. रिपब्लिकन सेनेचे रोपटं वाढलेले आहे. स्वबळावर वाटचाल सुरू असून देशाच्या कानाकोपऱ्यात रिपब्लिकन सेना गरुडझेप घेईल असा विश्वास वाटू लागला आहे.
या अभिवादन सभेला सभेत सागर डबरासे, विनोद काळे, भैय्यालाल, आशिष गाडे, हिरामण पगारे, प्रकाश खंडागळे, रमेश जाधव इत्यादींची भाषणे झाली. सभेला शशिकांत लिंबारे, विशाल भोसले, अक्षय भोसले, निर्मला खरात, सौ रीना जावळे, मंगला कांबळे, प्रदिप माने, अजित कंठे, तसेच ठाणे, मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, नाशिक, गुजरात, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, केरळ, गोवा, कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा, कोकण परिसरातील आंबेडकर अनुयायांनी गर्दी केली होती.
सूत्रसंचालन मुंबई प्रमुख संघटक राजेश शिंगारे यांनी पार पाडले. अनेक कार्यकर्त्यानी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची भीमप्रतिज्ञा केली.