जुन्नर : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या भटजीने विवाहित महिलेसोबत धरणाच्या भिंतीवर एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करणार्या भटजीला ओतूर पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली.
शशांक जोशी (वय-38, रा. ओतूर, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भटजीचे नाव आहे. याप्रकरणी स्वतः हजर राहून पीडित महिलेने ओतूर पोलीस ठाण्यात भटजीविरुध्द तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ओतूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला व संशयित शशांक जोशी यांची सन 2020 मध्ये फेसबुक अकाउंटमार्फत ओळख झाली. त्यानंतर जोशी हा पीडितेस सतत फोन करू लागला. एकदा पीडित महिला व जोशी हे खुबी येथील खिरेश्वरकडे जाणार्या रस्त्यावरील धरणाच्या बंधार्यावर असताना त्याने दोघांचे एकत्र फोटो काढले होते.
त्यानंतर जोशी याने वेळोवेळी आपल्या दोघांचे एकत्र काढलेले फोटो तुझ्या नवर्याला दाखवेल, अशी धमकी देऊन फोन करून भेटण्यास बोलवत असे. 2020 डिसेंबरमध्ये दुपारच्या सुमारास पीडितेचे पती घरातून बाहेर गेल्याचे बघून आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले.
तसेच त्याबद्दल कुणास काही सांगितले तर आपले फोटो व्हायरल करेल, तसेच माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईल, अशी धमकी फिर्यादीला दिली. यानंतर पुन्हा पुन्हा भेटायचे आहे, असे जोशी म्हणू लागल्याने त्यास पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने फिर्यादीची आई, भाऊ, बहीण यांना देखील फोन करून त्रास दिला. तसेच पीडितेच्या पतीचे मित्र यांना देखील त्याने दोघांचे एकत्रित काढलेले फोटो पाठवले. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.