पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धायरी परिसरात प्रेम प्रकरणाच्या करणावरून 4 जून 2017 ला झालेल्या अविनाश निळू आखाडे खून खटल्यातील 4 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे साहेबांच्या कोर्टाने हा निकाल दिला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली आहे. तुषार सणस, रोशन सणस, आकाश भटकर, मुकुंद सणस अशी निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जून 2017 ला आरोपी तुषार सणस, रोशन सणस, आकाश भटकर, मुकुंद सणस यांनी प्रेम प्रकरणाच्या कारणातून रायकर मळा, धायरी येथे मयत अविनाश याचे डोक्यात कोयते आणि इतर हत्याराने वार करून खून केला होता. सदर बाबत मयताच्या वडिलांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या नंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांचे विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
त्यानंतर सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सोळा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी तर्फे अॅड. विपुल दुशिंग व अॅड नितीन भालेराव यांनी कामकाज केले. आरोपींच्यातर्फे अॅड नितीन भालेराव यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, आरोपींच्या विरुद्ध कुठलाही सबळ पुरावा नसल्याने पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायधीश ए. एस. वाघमारे साहेबांच्या कोर्टाने चारीही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकिल अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. सदर प्रकरणात अॅड.मयूर चौधरी, अॅड. अजीज बागवान, अॅड. शुभम पालवे यांनी मदत केली.