लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात मागील 15 ते 20 वर्षापासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणारा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडीखांबे याला पुणे शहर पोलिसांनी बुधवारी (ता. 27) अटक केली आहे. याअगोदर प्रवीण मडीखांबे याच्या टोळीतील 13 जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे आता आरोपींची संख्या 14 वर गेली आहे. तर पुणे शहर पोलिसांनी इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडीखांबेला अटक केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
टोळी प्रमुख प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), थेऊर फाटा येथील अड्डा मालक श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुंबे, तूशांत राजेंद्र सुंभे (वय-31, रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), बारामती बस डेपोतील सहाय्यक कारागिर बाबासो माणिक देवकाते (रा. निमगाव केतकी, ता-इंदापूर, जिल्हा पुणे), राहुल गजानन काळभोर (रा. लोणी काळभोर ता. हवेली), रवी छोटेलाल केवट (वय-25, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली, जि. पुणे), विशाल सुरेश गोसावी (वय-30 रा. वाणीमला थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), कृष्णा ऊर्फ किरण हरीभाऊ आंबेकर (वय 31, रा. कदमावाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), रोहीतकुमार छेदु लाल (वय 25 रा. बोरकरवस्ती माळीमळा, ता. हवेली, जि. पुणे), अभिमान ऊर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय 35 रा. पांढरी रोड, कन्याशाळेच्या मागे, लोणी काळभोर, पुणे), पांडुरंग निळकंठ नकाते (वय 42 रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे ) आकाश सुखदेव घोडके (वय 24, रा. हनुमाननगर, कोथरुड, पुणे), तेजस तुकाराम वाघमारे (वय 23, रा. न्यू शांतीनगर, श्रावणधारा वसाहत, कोथरुड, पुणे) शुभम सुशील भगत (वय 23, रा. बोरकरवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली, जि. पुणे), व टँकर मालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मंगळवारी (ता. 10 सप्टेंबर) गस्त घालत होते. गस्त घालत असताना, कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाट्याजवळ असलेल्या एका रिकाम्या जागेत पत्र्याच्या शेडजवळ टँकरमधुन इंधन चोरी केली जात आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन इंधन चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना या इंधनचोरी प्रकरणात राहुल गजानन काळभोर व बारामती बस डेपोमधील कर्मचारी बाबासो माणिक देवकाते ही दोन नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रविण मडीखांबे व श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुंबे हे गुन्हा झाल्यापासून फरार झाले होते.
मोकाची कारवाई झाल्यापासून प्रविण मडीखांबे व श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुंबे हे दोघेही पोलिसांना चकवा देत होते. यातील आरोपी श्रीकांत ऊर्फ सोन्या सुंबेला मुंढवा व लोणी काळभोर पोलिसांनी सोन्या सुंबेला कात्रज परिसरातून मंगळवारी (ता. 15 ऑक्टोबर) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मात्र, आरोपी प्रविण मडीखांबे हा मागील तीन महिन्यांपासून चकवा देण्यास यशस्वी ठरत होता. पोलीस शोध घेत होते.
मात्र सापडत नव्हता. म्हणून पोलिसांचे एक पथक आरोपी प्रविण मडीखांबे याच्या मागावर होते. आरोपी प्रविण मडीखांबे हा पुण्यात वकिलाला भेटण्यासाठी येणार आहे. अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर व त्याच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून प्रविण मडीखांबे याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रवीण मडीखांबे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. त्याने बेकायदेशीर कृत्य चालु ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संयुक्त गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला आहे. सदर टोळीने मागील 15 वर्षात पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे पुन्हा पुन्हा केलेले आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या 11 जणांच्या टोळीवर कायद्याचा वचक बसावा म्हणून या अगोदरच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन 1999 चे कलम 3 (1) (ii) 3(2), 3/4) या अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार शिवाजी जाधव व लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मल्हारी ढमढेरे, बाजीराव विर यांच्या पथकाने केली आहे.