पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे. 288 पैकी 230 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात तब्बल 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील तब्बल 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 44 उमेदवारांचे डिपॉझिट वाचले आहे. त्यात 21 आमदार व त्यांचे प्रतिस्पर्धी 21 उमेदवार व अन्य दोघांचेच डिपॉझिट वाचले आहे.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढविणा-या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम अनामत रक्कम म्हणून जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीत एकषष्ठांश मते घ्यावी लागतात. मतदारसंघात निवडणुकीत तरच डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम परत मिळते.
‘या’ उमेदवारांचा समावेश
इंदापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची अनामत रक्कम जप्त केली आहे. तर मनसेच्या चारही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यात कोथरुड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे, खडकवासला मतदारसंघातील उमेदवार मयुरेश वांजळे, कोथरुडचे गणेश भोकरे आणि हडपसरचे साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. याचबरोबर पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागूल, वंचितचे नीलेश आल्हाट यांचा समावेश आहे. पुरंदरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संभाजी झेंडे यांची अनामत रक्कम थोडक्यात वाचली आहे.
कोणत्या मतदारसंघात किती जणांचे डिपॉझिट जप्त?
जुन्नर-8, आंबेगाव-9, खेड आळंदी-11, शिरुर-9, दौंड-12, इंदापूर-22, बारामती-21, पुरंदर-13, भोर-4, मावळ-4, चिंचवड-19, पिंपरी-13, भोसरी-9, वडगाव शेरी-14, शिवाजीनगर-11, कोथरुड-10, खडकवासला-12, पर्वती-13, हडपसर-17, पुणे कॅन्टोन्मेंट-18, कसबा पेठ-10, एकुण-259