मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. आज मंगळवारी सकाळी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार आहेत.
सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणूक कार्यक्रम संपल्यामुळे तसेच आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर शासनाकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. संजय कुमार वर्मा यांच्याकडून रश्मी शुक्ला पदभार स्वीकारणार आहेत.
राज्यातल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅपिंगचा आरोप असलेल्या रश्मी शुक्लांना निवडणुकीच्या काळात पदावरून हटवण्यात आलं होतं. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती केली होती. पण त्यांच्या नियुक्तीमध्ये तात्पुरती नियुक्ती असा शब्द वापरण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजून आला असून राज्यात आता महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लगेचच रविवारी सायंकाळी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता दिसून येत आहे.